Tuesday, May 30, 2017

प्रिसिजन - परफेक्शन आणि सामाजिक न्याय....

प्रिसिजन - परफेक्शन आणि सामाजिक न्याय....
काल एका सरकारी जमीन मोजणीला हजर रहावं लागलं,
आधीच कोकणी.... त्यात जमिनीचा दावा.... व भरीस भर म्हणून ती जमीन देवस्थानची... असं नाजूक प्रकरण....
चार पाच महिन्यापूर्वी एका वकिलांच्या विनंतीने हे प्रकरण खाजगी मोजणीसाठी माझ्याकडे आलं, तीन गावच्या सीमेवरचा जमिनीचा वाद ... देवस्थान कोणत्या गावाच्या हद्दीत ? आता सह्याद्रीच्या दुर्गम डोंगरमाथ्यावर असलेलं - अर्धा पाउण तास पायपीट करून वर पोचावं तर केवळ एक शंकराची घुमटी, शंभर एक माणसं बसतील एवढं पत्र्याचं छप्पर, उत्सवाचा - प्रसादाचा स्वयंपाक करण्याची दोन चुली असलेली एक खोली व दोन भक्तांच्या समाध्या एवढाच पसारा असलेलं देवस्थान हे काही उत्पन्नाच्या साधनासाठी ताब्यात हवं असाही वाद नाही, पण "आमच्या गावचं" देवस्थान म्हणून महाशिवरात्र व श्रावणी सोमवारचा "मान" आमचा हा हट्ट ! त्यामुळे हमरीतुमरी....२००८ पासून कुरबुरी.... एकाने मोजणी केली की दुसऱ्या गटाचा विरोध, त्यांनी मोजणी केली की पहिल्या गटाला ती अमान्य !! एका चाकरमान्याने अक्कल चालवून ह्या सीमेवरची पन्नास गुंठे जागा खरेदी केली, त्या जागेची मोजणी लावून (चिरीमिरी देवून) ते देवस्थान त्या जागेत असल्याचा नकाशा - नोंद केली ... डोंगर धार ( Ridge Line ) हीच सीमा असा साधारण भूमापनाचा सर्वमान्य संकेत त्या मोजणी करणाऱ्याने बाजूला ठेवला. "एवढ्या डोंगरात कोण येतं परत मोजायला ? परत आलो तर मीच येणार नां ? अशी भावना...
गावच्या जुन्या जाणत्या जमिनीच्या हद्दी माहीत असलेल्या म्हाताऱ्या लोकांच्या विरोधाला नव्या पिढीने " ह्या कॉम्पुटर सर्व्हेचं तुम्हाला कळत नाही, तुम्ही गप्प रहा " अशी बोळवण केली...वर अडाणी गावकऱ्यांना "आमचे साहेब तिकडे साताऱ्यात बसून सॅटेलाईट वरून लक्ष ठेवून हद्दी दाखवणार अशी लोणकढी थाप मारली.. ( कोकणातल्या जमिनीचा सर्व्हे ...अन् साहेब साताऱ्यात ? ) हे मान्य नसलेल्या गावकऱ्यांनी कोर्टात केस करायची तयारी केली. वकिलांनी मला " तुम्ही त्रयस्थ पणे मोजून वस्तुस्थिती मला सांगा, माझे पक्षकार चुकीचे असले तरी तसं सांगा " असं स्पष्ट सांगितलं, गावकऱ्यांनाही ते मान्य झालं,
चार एक महिन्यांपूर्वी यां देवस्थानाच्या तीनही डोंगर धारांनां फिरून जी पी एस ने सर्व्हे करून ,जुन्या खुणा शोधून मी माझा रिपोर्ट वकिलांना दिला ,
" यात किती फरक होऊ शकतो ? " - वकील
"जेमतेम पाच ते दहा फुट इकडे तिकडे, ते सुद्धा गावाचे रेफरंस मॅप १ : १०००० च्या स्केल चे आहेत म्हणून नकाशावर १/२ मिलीमीटर चुकलो तर जागेवर दहा फुट ".... मी
चालेल ! करुया अपील !!!
अपील झालं, कोर्टाने फेर मोजणीचा आदेश दिला अन् कालचा दिवस उजाडला....
सरकारी सर्व्हेअर टीम आपलं काम करत होती, त्यांचे वरिष्ठ साहेब स्वत: मशीन जवळ.... साहेब हजर असल्याने ओळखीचे सर्व्हेअर सुद्धा माझ्यापासून लांब ! अनेक कामं एकत्र केली असल्याने ओळख होतीच, पण 'सामनेवाला' खुसपट काढू नये म्हणून आम्ही लांब ! मी तर केवळ 'बघ्या' !
मोजणी झाली..... कॉम्पुटर चालू करायच्या आधी आमटी भाताचं प्रसादांच जेवण झालं..
पोटोबा झाल्यावर साहेबांनी कॉम्पुटरमध्ये डोकं घालून त्यांच्या टीमशी चर्चा केली - सुरवातीलाच आधी झालेली ५० गुंठ्याची मोजणी चुकली असल्याचं सांगितलं व त्या ५० गुंठ्याच्या नवीन हद्दी दाखवल्या... माझ्या हद्दी पासून सात आठ फुटावर !!
नवीन हद्दीमुळे देवस्थानाचे तीन भाग झाले..
पन्नास गुंठे वाल्याच्या गावाकडे दोन समाध्या - (त्यातली एक आमच्या पक्षकाराच्या वडिलांची) व देवळाचा थोडा भाग ....
आमच्या पक्षकाराच्या गावाकडे देवळाचा उरलेला भाग
प्रसाद बनवायची खोली तिसऱ्यां गावात !!
माझा सर्व्हे असा थोडा चुकलेला बघून मलाच थोडं वाईट वाटलं, भले मीच आधी आठ दहा फुट चुकेन हे मान्य केलं असलं तरी..... थोडी नाराजी होतीच...
गावकरी दाखवलेल्या हद्दीवर रंग लावत असताना 'साहेब' शेजारी येऊन उभे राहिले....
" शेंड्ये, वाईट वाटून घेऊ नको...
प्रिसिजन प्रमाणे तुझं बरोबर होतं, पण त्याने काय झालं असतं माहित्ये ? देवस्थान एकाच्याच हद्दीत दाखवलं असतं तर .... ?
हे तीन गावचे गावकरी जे देवासाठी - उत्सवासाठी एकत्र येतायत, एकत्र राबतायत, ते दूर झाले असते, म्हणून  थोडं सरकून देवाला तिघांच्यात वाटला !! देव तिन्ही गावच्या वेशीवरच राहुदे.... !!
एक नवीन दृष्टीकोन मिळाला ... नाराजी दूर झाली.... !
: : ‍‌त्रिविक्रम

Friday, November 14, 2014

माजं बी आत्मक्लेश......!!

काल रविवार,
तसं बघितलं तर आळसाचा.. आरामाचा.. दिवस ! 
पण एक आवडतं काम होतं, ते म्हणजे बरका फणस फोडायचं, 
मग लवकरच उठलो,. पटापट आवरून सकाळी ८ वाजताच  'ऑपरेशन' फणस पार पाडलं, आणि या सिझनचे पहिले बरके गरे हाणले !!
 आणि आठ सव्वा आठला तृप्त पोटाने कामाला बसलो.
दुपारी साधारणत: २ वाजता 'आता जेवावे' ह्या विचाराने उठणार तोच दापोलीहून क्लायंटचा फोन आला..
 " पटकन येवून जा" ..... चर्चा करायची आहे, म्हणजे मी रात्री मुंबईला जाईन... "
.
चला... रविवार बोंबलला असा विचार करून दापोलीला जायला गाडीला किक मारली, 
आणि "पटकन" १६० किमी लांब असणाऱ्या दापोलीला दिवसा उजेडी कामावर पोचलो ते संध्याकाळी साडेपाचला !
उजेड असेतोवर काम उरकून परत निघेपर्यंत साडेसात वाजले.. 

आणि रत्नागिरीत पोचेपर्यंत रात्रीचे ११, मग कसलं जेवण.. एक ग्लास दुध पिवून झोपलो.. 
सकाळचा 'ब्रेकफास्ट' रात्री ११ पर्यंत उपयोगी पडला !!.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"आयला !!! .


अजितदादा... म्हणजे काल माझं पण एक प्रकारे "आत्मक्लेश उपोषण" झालं की राव...
चला.. भाट्याच्या खाडीचं पाणी बारामतीच्या मीठ कारखान्याला कॅनाल ने न्यायचं टेंडर पक्क ना आता ??


( १५ एप्रिल २०१३ : : अजित पवार यांच्या 'आत्मक्लेश'  उपोषणानंतर.....)

Wednesday, October 15, 2014

कोकणी खजूर !!!

गोष्ट साधीच .. पण मजेशीर......
.
.
कामानिमित्य गेल्या आठवड्यात चिपळूण ला गेलो होतो, एका रेसिडेन्शिअल अपार्टमेंट प्रोजेक्ट च्या दोन विंगचा लाईन आउट पावसाळ्या पूर्वी केला होता, नंतर जुलै ची लेह सफर, आणि कोकणातला पाउस अशी साधारण तीन महिन्याची विश्रांती... त्यामुळे पाउस कमी झाल्यावर पुढची आखणी करण्याच्या दृष्टीने मिटींग होती. फक्त चर्चा .. त्यामुळे मोटरसायकलने गेलो, मालक कोकणी.. .. खारवी समाजातला, 'हज' ची यात्रा करून आलेला... एकदम प्रेमळ, त्यांनी मला सर्व्हे करताना - कामाला नेहमी कार ने हिंडताना बघितलेलं, त्यांना मी रत्नागिरीतून चिपळूण पर्यंत बाईकने गेलो ह्याचंच आश्चर्य ... मग माझा मित्र आणि त्यांचा कंत्राटदार - इंजिनियरने आणखी 'हवा' दिली... "अहो शेठ, चिपळूण काय... हे आत्ता जुलै मध्ये रत्नागिरीतून जम्मू- श्रीनगर - लेह - दिल्ली असे हिंडून आले...."
 झालं........ 
सगळ्या कामाच्या गोष्टी बाजूला ठेवून पुढचा अर्धा तास तो भला माणूस मला ह्या "अगोचर'' पणाबद्दल बोलत होता. अर्थात काळजीपोटी.. सगळी 'शाळा' करून झाल्यावर नेहमीप्रमाणे "रूह अफ्जा" चा ग्लास आणि काळया खजुराचा बाउल पुढे सरकवत त्यांनी शेवटचा बॉम्ब टाकला...
.
.
.
.
.
.
.
.
"हिकरशी थय दिल्लीपर्यंत फटफटीवर्रून गेलंव...... बोचो लाल नाय झैलो ??"
.
.
.
.
तुम्ही कधी काळा खजूर 'बी' सकट खाल्लाय का ? मी खाल्लाय !!!!
(25 Oct.12)

Tuesday, September 23, 2014

अन्न हे पूर्णब्रह्म !!

1988 चा मे महीना , 
नेपाळमधल्या पोखरा व्हॅली ट्रेकचा दुसरा दिवस, 
शेड्यूल प्रमाणे मुक्कामाच्या ठिकाणी दुपारी 2 वाजताच पोचलो आणि ग्रुपलिडर म्हणाला दिवस मोठा आहे, अजून पुढच्या गावात मुक्काम करू.... 
निघालो आणि पावसाला सुरूवात झाली ... 
4.30/5.00 वाजता पुढच्या नदी काठावर गावाच्या खुणा दिसू लागल्या आणि हूश्श वाटलं.....
 पण कसलं काय ? 87मधल्या पावसाळ्यात पुर आल्यावर सरकार ने सगळी वस्ती ऊठवली होती... शिल्लक होते फक्त मोडके चौथरे... 
परत सॅक पाठीवर मारून पुढच्या गावाच्या रस्त्याला लागलो ... 
रात्री 8.30च्या दरम्यान छोटी वस्ती लागली, तिथे चौकशी केली तर ट्रेक हटस् ( ट्रेकर्सच्या मुक्कामाची सोय) असलेलं गाव अजून 2 तासांनी आहे, ताकद आणि तयारी कोणाचीच नव्हती, मग याच वस्तीत मुक्काम करावा असं ठरलं, तर कोणीही जागा देइना, पावसाची रिपरिप, आतपर्यंत भिजलेले कपडे, घोट्या पर्यंत चिखलात जड झालेले हंटर्स, आणि गारठलेले पाय घेऊन 16 जण थंडीत कुडकुडत ऊभे.. पोटात आग पडलेली.... 9.00 - सव्वा नऊ म्हणजे गावात अपरात्र .. 
पाऊस वाढल्यावर मी एका घराच्या पडवीत जाऊन ऊभा राहीलो आणि आतून त्या घराच्या लक्ष्मीचा चढलेला आवाज आला 'कौन है.... 
 मी (वय वर्षे 15,) आणखी कुडकुडत म्हणालो..''दिदी थंड है...बुखार आएगा '' दार थोडं किलकिलं झालं ... बाई दरवाजात आली माझ्याकडे न बघता परत गेली आणि मी आत गेलो... ती ' राक्षी ' ( तांदूळाची बनवलेली घरगुती दारू) पित बसली होती, नवरा चुलीशी होता... असो..
ऊंटाला अरबाच्या तंबूत प्रवेश मिळाला होता !!
10 मिनिटं झाली आणि माझी 'तब्येत' बघायला बिनाताई आत आली, दिदीचा आवाज परत चढला, पण पाकीट काढल्यावर मग रात्री निदान 4 मुलींना आत घेण्याची मांडवली झाली ... 5 जणं शेकोटीशी बसलो..
अजून एक ग्लास संपल्यावर तिनंच विचारलं ...खाना खाया ? नही ..खाओगे ?? हां .
मेन्यू आणि रेट ठरवायला आजून दोघे आत आले...शेकोटीत दोन नवी लाकडं सारली... 
सिर्फ डाल चावल मिलेगा .. मेन्यू फायनल झाल्या वर तिने नवीन बाटली काढली, नवर्.याला सांगून उरलेल्या लोकांची रहायची व्यवस्था दुसरी कडे केली, पैसे मात्र कनवटीला लावले आणि बैठक मारून बसली... मी आणि नारायण (तिचा नवरा) पोटमाळ्यावरून फ्लॉवर बटाटे घेऊन ऊतरलो...हिने चार बटाटे ठेवून ऊरलेले परत बसल्या जागेवरून माळ्यावर भिरकावले... तांदूळ रेशनिंग करून झालं... नवरा तिला हळू बोलायला सांगत चूल फूंकत होता..मोठ्या पातेल्यात भात शिजत होता... तिने बैठकीखालून सुरा काढून फ्लॉवर कापायला घेतला... 4 बटाटे, पानं, देठं आणि नावाला थोडा फ्लॉवर साकटून पातेल्यात.....ऊरलेला परत माळ्यावर! !!
11.00 - 11.30 च्या दरम्यान सगळं प्रकरण निट रटरटलं ...अचानक परत तिचा आवाज चढला.. नारायण ने लोणचं काढलं होतं.. तिला न जुमानता वाढलं पण.... 
लोणचं .... आणि फ्लॉवर बटाट्याचं भाताबरोबर शिजवलेलं ते रसायन...
आहाहा... 
त्या दिवसापासून 'अन्न हे पुर्णब्रह्म' हे स्वतःच्या मनावर ठसवलं आहे !! 
...त्रिविक्रम शेंड्ये
( १९ ऑगस्ट २०१४ )

Thursday, September 18, 2014

एक दरोडा...... माणुसकी वर पडलेला !!

संध्याकाळी ए बी पी माझा वर "शामराव कोकरे" या धनगराचं घर लुटल्याची बातमी बघितली, त्याच्या झोपडीची दुरावस्था बघितली आणि माणसाच्या नीचपणाची किळस आली, 
वासोट्याच्या जंगलात गेली अनेक वर्ष एकटा 'झोपडी ठोकून रहाणारा शामराव आठवला, 
"ए पोरानो .... ह्या वाड्याशी न थांबता कुठं निघालात? वाईच बुड टेका, ताक प्या , मग दावतो 'सरीची वाट'.... 
असं प्रेमाने दरडावून सांगणारा शामराव आम्हा ट्रेकर्स चा आधार ! 
वासोटा हे वनविभागाकडून आरक्षित जंगल म्हणून जाहीर झाल्यावर ह्या गावातली बाकीची सर्व वस्ती उठून सातारा जिल्हातल्या दुसऱ्या ठिकाणी गेली, पण टणका शामराव काही हालंला नाही...
 "बापजाद्यांपासून राहिलो ते ठिकाण नाही सोडणार" असं सरळ सांगून त्याच रानात झोपडी ठोकून राहिला, झोपडी कसली, मोठ्ठा मांडवच ! सोबतीला बायको आणि तीन चार मुलं, बाकीची ३ /४ नोकरी निमित्ताने बाहेर... ..
शेजारीच ७० - ८० गुरं मावतील असा मोठा गोठा, कुडाच्या- शेणानं सारवलेल्या भिंती, सगळीकडे जाणवणारा शेणां-मुताचा वास....
बसायला पसरलेलं घोंगडं.. आणि प्रसन्नपणे समोर आणून ठेवलेली ताकाची मोठ्ठी घागर !! हो ... घागर !! ती मात्र चकचकीत स्टेनलेस स्टीलची .. 
प्या पोटभर.. लागलं तर आणखी हाय असं सांगणारा दिलदार शामराव !! 
ट्रेक संपत आलाय म्हणून उरलेला डाळ तांदुळाचा शिधा दिला तर घेणारा, पण ''पोरानो.. असतील तेवढ्या सगळ्या "माचीस" मला द्या, नायतर चूल पेटवायला चोरवण्यापर्यंत जावं लागंल" असं हक्कानं काड्यापेटी मागून घेणारा शामराव... 
७० -८० गुरं हायेत, एखादं दोन तीन दिवस नाही आलं परत, की समजतो वाघरांनं नेलं" असं सहजतेनं सांगणारा शामराव...
 चोरवण्यात पोचल्यावर एखाद्या ग्रुप ने ठरलेले पैसे नाही दिले तर अंगातली बंडी वर करून 'ह्या पोटाला काय घालू रे पोरां ... " असं म्हणून खपाटीला गेलेलं पोट दाखवणारा रोखठोक शामराव... 
काय मिळालं असेल त्याच्या झोपड्यात चोरी करून ?
नागेश्वर - वासोटा करून कोकणात उतरणांर्`यांचा  वाटाड्या म्हणून शामराव काम करतो, 
कठीण पण जवळच्या अशा वाटा त्याच्या पायाखालच्या.. जिल्हा सातारा असला तरी तिथून चिपळूण बाजारासाठी जवळ, म्हणून 'रेशन' साठी चिपळूण गाठणारा शामराव येताना घरचं लोणी घेऊन उतरतो, ते आधी "ऑर्डर" घेतली असते त्याला देण्यासाठी... 
जाताना आठवडा- पंधरा दिवसाचं रेशन आणि पुढच्या लोण्याच्या ऑर्डर .. हाच चरितार्थ... 
चिपळूण - चोरवणे बस वर आधी निरोप पाठवला तर ट्रेकर्सनां वाटाड्या म्हणून येणारा शामराव सगळ्या जंगलाचा राखणदार आहे, कोण कुठे काय तोड करतंय.. कोणत्या बाजूला जंगलतोड करणार्'यांनी गाडी रस्ता बनवलाय...अश्या बातम्या फॉरेस्ट ऑफिसरला पोचवणाऱ्या शामरावच्या झोपडीवर कोणी डल्ला मारला असेल ?
एवढ्या निर्जन ठिकाणी... जिथे जायला ( घाटावरून किंवा कोकणातून .. ) निदान ४ / ५ तास चालावं लागतं .. अश्या ठिकाणी कोणी नासधूस केली असेल ? जंगलतोड करणाऱ्या ठेकेदाराने ? ट्रेकिंगच्या नावाखाली हैदोस घालणाऱ्या एखाद्या ग्रुपने ?
कोणीही असेल पण ह्या प्रकाराने जंगलात शिल्लक असलेल्या माणुसकीवर हल्ला झालाय हे नक्की.....

त्रिविक्रम शेंड्ये 
(२८ जुन २०१४ )


Wednesday, September 17, 2014

माझी लैला !

"ती "

तशी आमची पहिली नजरभेट झाली ती साधारण: मी तिसरीत असताना, म्हणजे सुमारे ३3 वर्षांपूर्वी, ....
'मुंज झालेला बटू' म्हणून 'दाखवायला' मला घेऊन आजोबा गेले होते त्या घरात मी तिला पहिल्यांदा पाहिली, सावळी काय ? कचकचीत काळी होती ती.... पण त्या काळेपणांत पण एक रुबाब होता, मी 'काळी' आहे असं म्हणू नका.. काळी असले तरी "मी" आहे.. असा रुबाब...
खानदानी !!
पहिल्या भेटीतच मी तिच्या प्रेमात पडलोय हे लक्षात यायचं... ते वय अज्जिबात नव्हतं, लक्षात आलं ते ४/ ५ वर्षानंतर... ते सुद्धा "तिच्या" बद्दल माझ्या वयाचेच माझे मावस भाऊ, बोलत असत तेंव्हा... त्या वयातल्या चर्चा सुद्धा "तिच्या" नखरयांच्या असायच्या.. तीचं रूप, रंग, ऐटदार नाकातली ती ताऱ्याची चमकी... ती म्हणे त्यांच्या खानदानाची निशाणी... सगळ्यांच्या नाकात तश्शीच असते.. डिझाईन बदलत नाहीत..
"ती" चालायला लागली की लोकं तिला वाट करून द्यायचे... ती पुढे गेली की तिला जाताना पाठमोरी चाल पाहण्यातच धन्यता मानायचे... जणूकाही 'गज गामिनी'
अशा चर्चा झाल्या की वाटायचं २५ पैसे तास भाड्याची सायकल घेऊन त्या घरासमोरून चकरा माराव्या... पण ते घर खूप लांब, परत ती खानदानी.. अशी रस्त्यावरून येणाऱ्या - जाणाऱ्याला थोडीच दिसणार ती ?? मग लक्षात यायला लागलं की आपण तिच्या प्रेमात पडलोय चक्क.... मीच काय तिच्या बद्दल भरभरून माहिती सांगणारा माझा मावसभाऊ सुध्धा..
.....
वर्ष उलटत होती.. जसा जसा मोठा होत होतो तशी तिच्या बद्दल ... तिच्या घराण्यांबद्दल माहिती कळत होती... तिच्या प्रेमात अजूनच पडत होतो...
साधारण ८ वी/ ९वीत असताना तिला परत बघितलं.. तोच रुबाब.. तीच ऐट... देखणेपणात आणखी भर... ( तो आधीपासूनचं होता.. पण माझ्या लक्षात आता येत होतं...)
धीर करून मी तिला केलेला पहिला स्पर्श.. आणि हाताला जाणवलेली तिची ती उबदार थरथर.....बस्स.... कलीजा खलास झाला....
....
वर्षामागून वर्ष जात होती... आजोळी गेलो की तिची चौकशी.. तिची ख्यालीखुशाली कळतेय का ते बघणं... हिम्मत करून स्वत: विषय काढून चौकशी करणं अशी प्रगती चालू होती.... ती मात्र तशीच.. ऐटदार खानदानी....

वाढत्या वयाबरोबर.. कामाबरोबर मी पण दुसरीत गुंतून गेलो.. तिच्या खानदाना सारखीच , पण तिच्या समोर "गावठी" ठरणारी बरोबर संसाराला लागलो .. पण पहिलं प्रेम कसं विसरायचं ?
...
नात्यातल्या एका लग्नाला जायचं ठरल्यावर धीर करून आई ला म्हणालो .... ती येणार आहे ना ? मला आवडलीय ती...
आई फक्त हसली... तुला नाही रे झेपणार ते "प्रकरण" (आपली ऐपत बघून हात पाय पसरावेत....) ..... त्या लग्नाला ती पण आली होती, माझं "ध्यान" लांब आहे बघून मी हळूच तिच्याकडे गेलो.. लोकांची पर्वा न करता ... परत ती थरथर अनुभवली.. निशब्द थरथर.......
.
हल्ली तिच्या सारख्या दिसणांऱ्या खूप आहेत.. तिच्या पेक्षा टंच... मदमस्त ... पण तीचं खानदानीपण वेगळंच .... त्याची सर ह्या बाकीच्या भवान्यांना नाही....

... आज अचानक परत ती समोर आली... माझ्या प्रमाणे तीचं पण वय वाढतंय..., नाकातली चमकी थोडी निस्तेज झालीय.. पण रुबाब तोच...
तुम्हाला कदाचित ती ( १९५९) म्हातारी वाटेल , पण माझ्या साठी ती "स्वीट १६" आहे. मित्रानो... मी तिच्या आकंठ प्रेमात बुडालोय.... आणि म्हणतात ना..

" लैला को देखिये मजनू की नजरों से... "

मनमोहनजी....तुम्हारा जरा चुक्याच........

मनमोहनजी ,
आज तुम्ही तुम्हाला मिळालेली अखेरची संधी घालवलीत.....
तुम्हाला आणि साऱ्या देशाला माहीत आहे की आजचं तुमचं भाषण हे लाल किल्ल्यावरून केलेलं शेवटचं भाषण आहे.... म्हणतात नां, मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही .... मग या संधीचा फायदा घेऊन तुम्ही खरं तर तुमच्यावर दबाव टाकणाऱ्या व्यक्तींना देशासमोर आणायला हवं होतं, तसं ते आम्हाला काय, जगातल्या प्रत्येकाला माहीत आहे.. पण म्हणतात नां.. "फ्रॉम हॉर्सेस माऊथ ....असो.. आजचं तुमचं भाषण तरी कुठे तुम्ही स्वत: लिहिलं होतत ? तुम्ही फक्त ते वाचून दाखवलंत.....
अहो, आपल्या मुलाची १०० % चूक आहे हे माहीत असताना सुद्धा पैलवान बाप शेजाऱ्याला दमबाजी करतो, आणि तुम्ही आजही पाकिस्तानचा फक्त दोन चार वाक्यात गुळमुळीत निषेध केलात ? माणसाचा एवढा हळू आवाज 'शेजारच्या' घरात पकडला' गेल्यावर पण नसतो, तुम्ही तर शेजाऱ्याला तुमच्या घरात पकडला म्हणून दम देत होतात नां ? की तुमच्यात दम नाही हे हळू आवाजात सांगत होतात ? काही ऐकू आलं नाही... एवढे कोणत्या दगडाखाली हात आहेत तुमचे ? ह्या असल्या वागण्याने चुकीचे संदेश जातात, काळ सोकावतो...(राज्य मोडकळीला आलेल्या एका रशियन नेत्यांनी खरी परिस्थिती जगापासून लपवून १ में ला सर्व भांडवलशाही देशांना "बूट" उगारून दाखवला होता, आठवतं का ? अशी हिम्मत हवी.... )
"भारत निर्माण" च्या बाकीच्या जाहिराती टी.व्ही वर परत परत बघायला मिळतील, पण आजची तुम्ही केलेली जाहिरात नाही... अहो गेल्या १० वर्षात काय केलं हे सांगण्यासारखं असतं, तर गेल्या ६६ वर्षाचा कॉंग्रेसचा संपादित इतिहास( शास्त्री, पटेल, तुम्ही अर्थमंत्री होतात तेव्हाचे पंतप्रधान नरसिंहराव यांची नावं वगळलीत तुम्ही, म्हणून संपादित म्हणालो) सांगत बसला नसता तुम्ही...कॉंग्रेसचा नाही, गांधी घराण्याचा अहवाल वाचलात तुम्ही...
एकीकडे तुमचे ते गुजराथी "संताजी घोरपडे " ( दिसतात नां तुम्हा सगळ्यांना ते जळी-- स्थळी --- ) त्यांनी गुजरात मध्ये १० वर्षात काय काय केलं ते सांगत होते.... आणि तुम्ही अख्ख्या कॉंग्रेसने काय केलं ते वाचत होतात.... " सांगे पूर्वजांची कीर्ती तो एक ........" २०१४ नंतर भरपूर वेळ आहे, तेंव्हा दासबोध वाचा.......
त्यांच्या सर्व भाषणातील आकडेवारी खोटी असते, असं तुमचे सर्व हुशार प्रवक्ते खुर्शीद मामू, डॉग्गीराजे ( मला "दिग्गी" का लिहिता येत नाही ? हा कीबोर्डचा प्रोब्लेम आहे!! ) म्हणत असतात, मग जरा कष्ट घेऊन तुमच्या म्याडमनी सीबीआय मार्फत गुजरातची गेल्या पाच वर्षाची तरी खरी आकडेवारी का काढून दिली नाही ? ती वाचून तरी त्या 'फेकू' एक्सप्रेसला आज लाल किल्ल्यावरून लाल बावटा दाखवता आला असता. पण ते " एकदम टंच माल" म्हणण्या इतकं सोप्प आहे का ? तेंव्हा सांभाळून, 'हिरवा झेंडा' प्रेमाने जवळ घेऊन जोराने हलवाल आणि 'फेकू एक्सप्रेस' जास्ती जोरात येईल दिल्लीकडे...
भाषणात एक क्षण तर मी मुंबई मंडईचे बाजारभाव ऐकतोय असं वाटलं.. २ रू किलो..३ रू. किलो... काय हो, इतकी स्वस्ताई आहे सगळीकडे तर आमदारांची पेन्शन का २५००० वरून ४०००० केली ? की ते पेन्शन डॉलर च्या किमतीवर अवलंबून आहे ? हाताबरोबर १० वर्षातले डॉलरचे बदललेले( म्हणजे फक्त चढलेले) भाव पण वाचून दाखवायचे.. असो..
ती 'स्पेशल स्कील अक्वयार प्रमोशन' ची घोषणा नक्की कोणासाठी आहे हो ? पांढऱ्या शुभ्र कांजी केलेल्या कपड्यांनी डोक्यावर रिकामं घमेलं घेऊन 'कष्ट' करणारयांच्या स्कील साठी ? किती पैसे बाजूला काढलेत इलेक्शन फंडातून ? असल्या 'अवार्ड'ला (की लाचेला ? ) भुलून युवापिढी कॉंग्रेसकडे आकर्षित होईल ? बुडत्याचा पाय खोलात ....
तुम्हाला ती स्वत:च्या मुलाला पायाखाली घेऊन स्वत:चा  जीव वाचवणांरी माकडीणीची गोष्ट माहीत आहे का ? 
२०१४ ला त्या गोष्टीत थोडा फरक होणार आहे, तुम्हालाला पायाखाली घेऊन एक आई तिच्या  मुलाचा जीव वाचवणार आहे, तेंव्हा पाणी नाकापर्यंत यायची वाट बघू नका, आधीच हौद फोडायचं बघा....
गेली १० वर्ष आम्ही राजकारणामुळे एक उत्तम अर्थतज्ञ गमावला असा समज आहे, निदान त्याला तडा जाऊ देणार नाही अशी आशा ठेवू का ?
वेताळ कथेसारखं "तुम्हाला उत्तर माहीत असून दिलं नाहीत तर डोक्याचे १०० तुकडे ...." वगैरे म्हणायची पण सोय नाही,तुमचं तोंड उघडायला 'केजीबी' ला सुद्धा जमणार नाही...
( बघा, मी तुम्हाला निवृत्ती नंतरचा दुसरा व्यवसाय सुचवतोय......)
वंदे मातरम !!!

त्रिविक्रम शेंड्ये 
( फेसबुक - १५ ऑगस्ट २०१3 )